छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Rohit Pawar On Beed Riots:मी बीडमध्ये पंडित अण्णा क्षीरसागर यांच्या घरी गेलो होतो. तिथे जे आंदोलन करण्यासाठी आले होते ते प्रोफेशनल असून त्यांच्याकडे फॉस्फरस बॉम्ब आणि पेट्रोल बॉम्ब होते. (Rohit Pawar Sangharsh Yatra) एकमेकांशी संवाद साधताना कोणत्या घरी जायचं त्याबाबत नंबरचा वापर करीत होते. एका गाडीत विशिष्ट मापाचे दगड होते. ते संपले की परत गाडीतून दुसरे दगड ते आंदोलक आणायचे. पहिली टीम एकाच फटक्यात दगड मारून सीसीटीव्ही फोडायचे. दुसरी टीम त्याबाबत मोबाईलवर कोण चित्रीकरण करत आहे का, ते पाहून त्यांचे मोबाईल घेत होती किंवा फोडत होती. (Riots in Beed) तर तिसरी टीम हातात दगड, फॉस्फरस आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन हल्ला करायचे. त्यांना लोक अडवत असताना ते ऐकत नव्हते. बहुदा त्यांनी काहीतरी व्यसन केलेलं होतं. म्हणून ते कुठेही पळत होते आणि काहीही करत होते.
जखमी लोकांवरील उपचारासाठी अँब्युलन्स तैनात :इतकंच नाही तर त्या टोळीतील जखमी लोकांना उपचार देण्यासाठी अँब्युलन्स देखील तैनात होत्या. ते लोकांना घेऊन कुठे गेले कोणत्या रुग्णालयात गेले काहीच माहिती नाही; मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. आधी त्यांनी मुस्लीम वस्तीत जाऊन हा प्रयत्न केला. परंतु तसे होऊ शकले नाही. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या घरावर हल्ला करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाला त्याचा फायदा होईल म्हणून हे केलं गेलं असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
निर्दोष लोकांवर कारवाई :आंदोलना दरम्यान जाळपोळ करणारे सर्व लोक तिथून पळून गेले. मात्र पोलिसांनी तिथे आजूबाजूला असलेल्या मुलांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड करण्यात येत आहे. पोलिसांनी तसं करू नये. जे दोषी आहेत त्यांना पकडावं. जे निर्दोष युवक त्या ठिकाणी उभे होते, त्यांच्यावर कारवाई करता कामा नये. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली.