औरंगाबाद - पैठण येथील उच्चभ्रू वस्तीवर दरोडा टाकण्याचा कट नागरिकांच्या दक्षतेमुळे हुकल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. मात्र, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
औरंगाबादमध्ये नागरिकांच्या सतर्कतेने उच्चभ्रू वस्तीतील दरोडा फसला हेही वाचा-'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'
पैठण येथील पंचायत समिती जवळ बालाजी विहार आणि रामनगर ही उच्चभ्रू वस्ती आहे. या ठिकाणी शहरातले मोठे व्यापारी, सोनार अशा लोकांचे घर आणि फ्लॅट आहेत. काल रात्री दीडच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर वस्तीत शिरले. हे दरोडेखोर तोंडाला पट्ट्या बांधलेले होते. त्यांनी या भागातल्या सर्व घरांची रेकी केली. रामलाल जाधव यांच्या घरात दाराची कुंडी तोडून शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी येथील काही जागरुक नागरिक उठल्याने त्यांनी आरडाओरड केली. अंधाराचा आसरा घेत त्या दरोडेखोरांनी पळ काढला. परंतु, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती पैठण पोलीस ठाण्यात देण्यात आली.
अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कार्कीन याठिकाणी दोन दिवस अगोदर अशाच प्रकारच्या दरोड्यात 67 हजार रुपयाची लूट झाली होती. या घटनेची दखल घेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न करत आहेत.