पैठण (औंरगाबाद)- दरोडेखोरांनी एकाच रात्री शेत वस्तीवरील दोन घरावर दरोडा टाकला आहे. यात तीन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. यात दरोडेखोरांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना पैठण तालुक्यातील पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील थेरगाव येथील गोलांडे कर्डिले शेतवस्तीवर शनिवार (दि. 13 मार्च) मध्यरात्री घडली आहे.
विनायक माणिकराव गोलांडे (वय 70 वर्षे), ताराबाई विनायक गोलांडे (वय 65 वर्षे) व त्यांची मुले ऊसतोडीला गेलेली असल्याने नातवंडे त्यांच्या सोबत राहत आहेत. कृष्णा कालिदास गोलांडे (वय 12 वर्षे), धनश्री कालिदास गोलंडे (वय 8 वर्षे), तेजस रोहिदास गोलांडे (वय 13 वर्षे), पूजा गोलांडे ( 10 वर्षे), रंजना अशोक कर्डीले (वय 35 वर्षे), अशोक कर्डिले (वय 40 वर्षे) असे जखमींचे नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सात ते आठ चोरट्यांनी विनायक गोलांडे यांना हात-पाय धरून दाबून ठेवले व अन्य चार ते पाच चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराला मोठी दगडे मारून दार उघडण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये झोपलेल्या ताराबाई गोलांडे व त्यांच्या नातवंडा दार उघडा म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर त्यांची नात पूजा गोलांडे ही नातेवाईकांना मोबाईलवरून फोन लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच कोणाला काही सांगितले तर कापून टाकू, असे म्हणत दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करत लाठ्याकाठ्याने ताराबाई गोलांडे सह चिमुकल्या मुलांनाही मारहाण केली. यात ताराबाई गोलांडे यांच्या कानातील, नाकातील सोन कात्रीने कापून घेत जखमी केले. त्यानंतर मोबाईल हिसकावून सर्वांना घरात कोंडून पळ काढला. त्यानंतर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अशोक अंबादास कर्डीले यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला. कर्डीले यांच्या आजूबाजूला असलेल्या घरांच्या बाहेरून कडी लावून कर्डिले यांच्या घराच्या दरवाजावर दगड टाकत दार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर रंजना अशोक कर्डीले (वय 35 वर्षे) यांच्या डोक्यात व हातावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर अशोक कर्डिले (वय 40 वर्षे) यांनाही जबर मारहाण करत त्यांच्याही घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, पोलीस निरीक्षक किशोर पवार हे त्या मार्गावरून जात असताना वस्तीवर काहीतरी घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती किशोर पवार यांनी तत्काळ पाचोड पोलिसांना दिल्यानंतर पाचोड पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.