औरंगाबाद - मालेगाव येथील बंद घर फोडून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या औरंगाबादच्या दोन जणांना शनिवारी गुन्हे शाखेने अटक केली. धम्मा कांबळे (४०), विनोद विजय बत्तीसे (२३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे बारा हजार रूपये किमतीचा चोरीचा माल जप्त केला आहे. त्यांना मालेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
मालेगावात घरफोडी करणारे दोन चोरटे गजाआड - विनोद विजय बत्तीसे
औरंगाबादच्या दोन चोरट्यांनी मालेगाव येथील बंद घर फोडून सुमारे बारा हजार रुपये किमतीची चांदीची भांडी चोरली. या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांना मालेगाव पोलीसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

गुन्हे शाखेचे निरिक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झाने, राजेंद्र साळुंके, गजानन मांटे हे गस्तीवार असताना त्यांनी रेकॉर्डवरील चोरटा धम्मा कांबळे (४०) रा. चेतनानगर हर्सुल याला संशयावर ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने विनोद बत्तीसे (२३) रा. मिलींदनगर उस्मानपुरा, आणि सांतोष खरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. यापैकी आरोपी खरे हा मालेगाव येथेच असल्याचे त्याने सांगीतले. यानंतर पोलीसांनी विनोदला पकडले. दोन्ही आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे बारा हजार रूपये किमतीची चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहेत.