औरंगाबाद - ओबीसींची जनगणना व्हावी ही आमची इच्छा आहे. खरंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची देखील इच्छा होती, एखाद्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याची जनगणना ही उपयोगी असते. त्यामुळे ही मागणी म्हणजे आमच्या चळवळीचा एक भाग आहे, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
हिंदीत ट्विटचा विपर्यास करू नका
मी केलेलं ट्विट हे हिंदीमध्ये आहे. मात्र त्यामागे दुसरा काही उद्देश नसून मी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदावर आहे. त्यामुळे त्या पदाला अनुसरून मी माझा ट्विट हिंदीमध्ये केले आहे. राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती झाल्यानंतर सातत्याने काही संदेश किंवा शुभेच्छा असेल तर त्या हिंदी मध्ये देत आहे. त्याच्यामुळे हिंदीत शुभेच्छा देण्यामागे दुसरे इतर कोणतेही कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
तूर्तास मुख्यमंत्री पदाची दावेदार नको
सध्या राज्यात ओबीसींचा मुख्यमंत्री हवा असा सूर निघत आहे. त्यामुळे राज्यात महिला ओबीसी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहेत. या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, तूर्तास मला यातून बाजूला ठेवा. कुठल्याही पदावर नसताना ही चळवळ लढायची आहे आणि ही एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कशी चालेल हे मात्र आगामी काळात दिसून येईल, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे.