औरंगाबाद- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापकाने उलटा राष्ट्रध्वज फडकवल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील नागापूर येथील शाळेत घडला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मुख्याधापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत फडकवला उलटा राष्ट्रध्वज; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल - स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी चुकीने राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मुख्याधापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवारी सकाळी सुरू झाला. त्यावेळी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. मात्र, चुकीने तो उलटा फडकवला गेला. त्यानंतर लगेच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थित ग्रामस्थांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी याबाबत मुख्यधापक दीपक बळे यांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रगीत मध्येच थांबवून उलटा राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला. पुन्हा व्यवस्थित करून राष्ट्रध्वज फडकविण्यात आले.
या घटनेचा काही उपस्थितांनी चित्रीकरण केले होते. ते व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर उपस्थित गावकरी सर्जेराव घुगे यांच्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियमानुसार शाळेचे मुख्याधापक दीपक बळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.