जनावरांच्या सुटकेप्रकरणी सांगताना पोलीस अधिकारी गंगापूर (औरंगाबाद):गंगापूर पोलिसांना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या नियंत्रण कक्षाकडून काही गोरक्षकांनी अवैध गोवंश वाहतुकीचा टेम्पो भेंडाळा फाट्याजवळ पकडून ठेवल्याची माहिती मिळाली. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे फौज फाटा घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही गोरक्षकांनी टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक (एम.एच.४८टी ९९८४) थांबवून ठेवला होता. या वाहनांमध्ये २२ लहान मोठी जनावरे कोंबून ठेवले होते.
तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल:जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीवर पोलिसांनी कारवाई केली. घटना प्रकरणी टेंपोचालक सिकंदर खान राजु खान, सय्यद रईस सय्यद युनुस, फैसल जावेद कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून २२ जनावरे आणि टेम्पो असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीनही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुटका केलेल्या जनावरांना संभाजीनगर येथील गोशाळेत पाठवले आहे.
पोलिसांची कारवाई:गंगापूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात देखील अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या ३५ गायी त्यांची किंमत अंदाजे १० लाख यांची देखील सुटका करून संबंधित व्यक्तींवर कारवाई केली होती. ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास निभोंरकर, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत डहाळे आदींनी केली आहे. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीडमधील गोरक्षकांची सतर्कता: कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 45 जनावरांची पोलिसांनी 10 जानेवारी, 2023 रोजी तत्परतेने सुटका केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई बीडच्या खडकत गावात पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्यासह टीमने केली होती. गेल्या सहा महिन्यांमध्ये पोलिसांनी जवळपास 250 जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान देण्याचे काम केले होते.
दोघांवर गुन्हा दाखल: आष्टी तालुक्यातील खडकतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांनी कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या टीमने कारवाई केली. याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जनावर तस्करांविरुद्ध कारवाई: या अगोदरही अहमदनगर ते अहमदपूर मार्गावर नेकनूर येथे गाई घेऊन जाणारा एक टेम्पो पकडण्यात आला होता. याच टेम्पोमध्ये जवळपास 30 गाई होत्या. त्याच्यानंतर याच मार्गावर हैदराबादकडे तब्बल 35 बैल घेऊन जाणारी चारचाकी पकडण्यात आली होती. त्यामुळे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कत्तलखाने आहेत. कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडून त्यांचे गोशाळेत संगोपन केले जाते. एकीकडे जनावरांचे संगोपन करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासली की, जनावरांची विक्री करतात. मात्र जनावरांची विक्री करत असताना ती कत्तलखान्याकडे नेणाऱ्या व्यापाऱ्यांना करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा:Mumbai Crime: चोरीच्या चेकवर आरटीजीएस स्लिप भरून साडेसात लाख केले लंपास