औरंगाबाद - इंधन दरवाढीविरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला वरचा आर्थिक भार वाढला असून त्यामुळे गरिबांचे जगणे अवघड झाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.
इंधन दरवाढीविरोधात रिपब्लिकन सेना रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर केला स्वयंपाक -
पर्यावरणाचा वाचण्यासाठी चूल पेटवू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. अनेकांना उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅसचे वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमामुळे निसर्गाचे संवर्धन होईल यात शंका नाही. मात्र, दुसरीकडे गॅसचे दर वाढवण्यात आले. त्यामुळे आता सर्वसामान्यांना गॅस घेणे परवडेनासे झाले आहे. आता चूल पेटवायला लाकडे ही नाहीत आणि गॅस घ्यायला पैसे नाही. अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळे गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गॅसचे दर वाढत राहिले तर पुन्हा एकदा चुलीवरचा स्वयंपाक करण्याची वेळ गरीब जनतेवर येणार आहे, असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला.
आंदोलक आले बैलगाडीत -
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चालले असून पेट्रोल ने शंभरी पार केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. दैनंदिन कामासाठी वाहनाचा वापर सर्वसामान्यांना करावा लागतो. त्यामुळे त्याचा आर्थिक भार सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. इंधनाचे भाव जर कमी झाले नाही तर पुन्हा बैलगाडी वापरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे म्हणत रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन ठिकाणी बैलगाडी आणून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शासनाच्या या हिटलरशाही निर्णयामुळे गोरगरीब जनता घर कसे चालू होणार असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.