औरंगाबाद -सुट्टीत घरी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानास कोरानाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली. या जवानाशी देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील त्याच्या 12 नातेवाईकांशी संपर्क आला होती. या नातेवाईकांची रविवारी (ता. 3) कोरोना तपासणी करण्यात आली होती. या बाराही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्यासोबत परिसरातील इतर नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुटकेचा निःश्वास.. 'त्या' जवानाच्या संपर्कातील बाराही नातेवाईक 'कोरोना निगेटिव्ह'
सुट्टीत घरी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानास कोरानाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली. या जवानाशी देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील त्याच्या 12 नातेवाईकांशी संपर्क आला होती. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिरापूर येथील एक जवान राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. बंदोबस्तासाठी त्यांना मालेगाव येथे पाठविण्यात आले होते. येथून आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यादरम्यान हा जवान देवगाव रंगारी येथील नातेवाईकांकडे जाऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येथील नातेवाईक असलेले पाच जण व जवळच असलेल्या वाडीवरील सात अशा 12 जणांना पोलिसांनी तपासणीसाठी औरंगाबादेतील एमआयटी रुग्णालयात पाठवले होते. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भवर व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग न झाल्यामुळे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, देवगाव रंगारी व परिसरातील गावांमध्ये दुसऱ्या शहरातून कोणी नवीन आल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाणे किंवा गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती द्यावी. माहिती लपवून ठेवू नये. तसेच, लाॅकडाऊनसंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, सरपंच कविता सोनवणे, ग्रामविकास अधिकारी भीमराव सिरसाठ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.