औरंगाबाद- नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांचे नातेवाईक आता त्रस्त झाले आहेत. रोज होणाऱ्या आरोपांना कंटाळून वानखेडे यांच्या नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलिसात ॲट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
समीर वानखेडे यांच्या आत्याने दिली तक्रार...
मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या गुंफाबाई भालेराव या वृद्ध महिलेने समीर वानखेडे त्यांचा भाचा असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील हे गुंफाबाई यांचे सख्खे मोठे भाऊ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवाब मलिक रोज करत असलेल्या आरोपांमुळे इतर नातेवाईक त्रास देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवाब मलिकांचे आरोप थांबतील आणि प्रकरण शांत होईल, असे वाटत होते. मात्र, मुख्य प्रकरण सोडून नवाब मलिक रोजच आरोप करत आहेत. खरंतर गरीब कुटुंबातील हा मुलगा असून मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने त्यांना शिक्षण घेत समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, मंत्री मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेच नाही तर आम्ही देखील त्रस्त झालो असून नवाब मलिक यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गुंफाबाई भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलिसात केली आहे.