औरंगाबाद - शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी विक्रमी मतदान केले. जिल्ह्यात एकूण 80 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 569 ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 268 मतदान केंद्रावर मतदान झाले. 11 हजार 499 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी 18 जानेवारीला होणार आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे.
उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद -
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 80 टक्के विक्रमी मतदान - औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणूक २०२१
राज्यात शुक्रवारी एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी राज्यात सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली होती. निवडणूक आयोगाने राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली होती.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. एकूण 617 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर, सहा ठिकाणी मतदान घेतले नाही. यामध्ये 617 पैकी 579 ग्रामपंचायतीमधील 4 हजार 699 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी 11 हजार 499 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 5 लाख 51 हजार 822 महिला तर 6 लाख 4 हजार 804 पुरुष अशा एकूण 11 लाख 53626 पैकी 9 लाख 25 हजार 300 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
- औरंगाबाद -७३.१५ टक्के
- पैठण-८४.९६ टक्के
- सिल्लोड-८२.८८ टक्के
- फुलंब्री-८४.८५ टक्के
- कन्नड-७९.५० टक्के
- सोयगाव-८१.२४ टक्के
- वैजापूर-८०.३१ टक्के
- खुलताबाद-८४.४७ टक्के
- गंगापूर-७३.९७ टक्के
- एकूण ८०.७० टक्के