रॅप साँग म्हणणाऱ्याला राज मुंगसेला अटक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): एका युवकाला गाणे तयार करणे चांगलेच महागात पडले आहे. या गाण्यात त्याने अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे गटावर टीका केली होती. पन्नास खोके एकदम ओके या वाक्याला अनुसरून राजकीय नाट्य देखील गाण्यातून रंगवले. मागील पाच दिवसात या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले असून, ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी याबाबत तक्रार दिल्यावर अंबरनाथ पोलिसांनी या युवकाला अटक केली आहे.
तिसगाव येथील युवक: तिसगाव येथील राज मुंगसे या युवकाने एक रॅप सॉंग तयार केले होते. त्या गाण्याला पाच दिवसात लाखो लोकांनी पसंती दर्शवली. मात्र हीच बाब एकनाथ शिंदे गटातील समर्थकांना खटकले आणि त्यांनी अंबरनाथ पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव येथे राहणाऱ्या राज मुंगसे या युवकाने हे गाणे तयार केल्याचे समोर आले. गुरुवारी दिवसभर त्याला शोधण्यासाठी पोलीस शहरात फिरत होते, एमआयडीसी वाळूज पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तिसगाव येथील त्याच्या घरी तपासणी केली मात्र तो घरी नव्हता. त्यापुढे त्याला कुठे अटक केली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, युवकला अटक केल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
गाण्यातून भाष्य: राज्यात रंगलेलं राजकीय नाट्य देशभरात नाही तर जगभरात चांगलंच गाजले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून आपला वेगळा गट तयार केला. त्यावेळी गुवाहाटी, गोवा मार्गे रंगलेले राजकीय नाट्य चर्चेचा विषय राहिला. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन सत्ता स्थापन केली खरी, मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून 50 खोके एकदम ओके हे वाक्य प्रत्येक भाषणात गाजले. त्याचाच आधार घेत सर्व राजकीय नाट्य परिस्थिती दर्शनावर गाण राज मुंगसे यांनी तयार केले. पन्नास खोके एकदम ओके... गुहाटी मार्गे.... असे अनेक वाक्य त्याने वापरून हे गाण तयार केले आणि त्या गाण्याला लाखो लोकांनी पसंती दर्शवले आहे.
राज मुंगसे याच्या कुटुंबीयांना नाही माहिती:रॅप सॉंग तयार करणारा राज मुंगसे हा वाळुज जवळील तिसगाव शिवारात राहत होता. पोलिसांनी त्याच्या घरी तपासणी केली असता, मागील तीन वर्षापासून त्याच्याशी संपर्क नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेणारा राज मुंगसे विद्यापीठात वसतिगृहात राहत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतीत कुठलीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमकी कारवाई कशी आणि कुठे झाली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गुरुवारी दिवसभर अटकेची शक्यता निर्माण झाली होती, इतकच नाही तर त्याबाबत खात्रीलायक माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली होती. त्याबाबत विचारणा केली असता संभाजीनगर पोलिसांनी कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे अटकेबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली