औरंगाबाद - रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपले सासरे केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी जर आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी रावसाहेब दानवे जबाबदार राहतील, असा इशाराही हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे.
'मी आत्महत्या केल्यास रावसाहेब दानवे जबाबदार माझी पत्नी संजना आणि माझं कधी जमलं नाही. संजनाने पत्नी असण्याचे कर्तव्य कधी बजावले नसल्याने माझे मानसिक संतुलन बिघडत होते. त्यामुळे मला उपचार घेण्याची वेळ आली, असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडिओ व्हायरल केला होता. ज्यात त्यांनी राजकीय संन्यास घेत उत्तराधिकारी म्हणून त्यांची पत्नी लोकांच्या समस्या सोडवेल, असे जाहीर केले होते.
आता पुन्हा एक नवीन व्हिडिओ हर्षवर्धन यांनी समाज माध्यमावर टाकत रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2004 निवडणुकीत एक मोठा राजकीय पक्ष आपल्याला उमेदवारी देत होता मात्र, त्यावेळी दानवे यांनी मदत केली नाही. 2009 आणि 2014 च्या निवडणुकांमध्ये आपण आपली संपत्ती विकून निवडणूक लढवली. 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैसे नसताना मित्रांच्या मदतीने निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनीच मला पाडायचे काम केले, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर काही गुन्हे दाखल झाले. त्यांच्या मुलीने म्हणजेच माझ्या पत्नीने माझ्या ऐंशी वर्षाच्या आईवर गुन्हे दाखल केले आणि ते मागे घेण्याचे नाटकही केले. दानवेंना दिल्लीला भेटण्यासाठी गेलो असता, त्यांनी धमकी दिली. त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब झाली असून माझ्या पत्नीला माझी काही संपत्ती देतो, मात्र मला छळू नका, अशी विनंती हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांना केली आहे.