औरंगाबाद- मॅनेजरच्या घरात शिरुन रिकामा गावठी कट्टा त्यांच्या मुलाच्या डोक्याला लावून ५७ हजाराची मागणी करणाऱ्या दूध डेअरी चालकाला मयूरपार्क परिसरातील नागरिकांनी पकडून हर्सुल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी कट्टयाचा धाक दाखवत खंडणी मागणारा जेरबंद - खंडणी
राहुल साहेबराव आधाने (२९, रा. रांजणगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुल साहेबराव आधाने (२९, रा. रांजणगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दूध विक्रेता राहुल आधाने हा इंड्यूरन्स कंपनीतील संजय गाडे (५२, रा. मयूरपार्क) यांच्या घरी आला होता. आधानेचा धाकटा भाऊ गाडे यांच्याकडे घरकामाला आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास दीक्षित घरात आहेत का ? अशी विचारणा करत आधाने हा गाडे यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने अचानक गाडे यांच्या १८ वर्षीय मुलाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून घरात जे असेल ते हवाली करा, असे म्हणताच गाडे यांनी प्रसंगावधान ओळखत आधानेला घराच्या पहिल्या मजल्यावर नेले. तेथून शेजारील नागरिकांना मदतीसाठी हाक मारली. त्यानंतर नागरिकांनी आधानेला बेदम चोप देत हर्सुल पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गाडे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. आधानेला ताब्यात घेत त्याच्याकडून रिकामा गावठी कट्टा हस्ततगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे करत आहेत.