औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज( 14 जानेवारी) 26 वा नामविस्तार दिन आहे. मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात असला तरी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी तब्बल 17 वर्षे लढा द्यावा लागला. या लढ्यात शिपाई पासून तर साहेबांपर्यंतच्या वर्गातील लोक सहभागी झाले होते.
सरकारला कुठलेही पैसे खर्च करायचे नव्हते, ना कुठला निधी उभारायचा होता. फक्त विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे होते. मात्र, त्याला देखील काही तत्कालीन समाजसुधारकांनी विरोध केल्याने 17 वर्ष लढावे लागले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले लागल्याचा अनुभव नामांतर लढ्यात सहभागी आंदोलक रामेश खंडागळे, यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
मराठवाडा विद्यापीठ गोर गरिबांसाठी शिक्षणाचे दार उघडणारे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. त्या विद्यापीठाला त्यांचंच नाव देण्यासाठी त्यांच्या अनुयायांना 17 वर्ष रस्त्यावर लढा द्यावा लागला. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत उभारलेला लढा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा. 1978 मध्ये नामांतराच्या लढ्याला सुरुवात झाली. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने एकमुखाने मागणी मान्य देखील केली. मात्र, त्यावेळच्या उच्चशिक्षित घटकाने याला जातीवादी स्वरूप देण्याचा प्रयत्न करत विरोध केला. मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचवेळी इथे विद्यापीठ असावे असा त्यांचा आग्रह होता.