औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मी भेटलो होतो. 2009 ते 2014 या काळात एकत्र काम केले आहे. तेलंगणा वेगळे झाल्यावर तिथे झालेल्या विकासानंतर आमची ती भेट झाली होती. तेलंगणाच्या संदर्भात मी त्यांच्या पाठीशी राहिलो. त्यामुळे आमची चांगलीच चर्चा झाली. आता आमची तेलंगणा राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्रसमिती करण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्रात तुम्ही प्रमुख होऊन काम करावे, अशी इच्छा त्यांनी दर्शवली होती. मात्र त्यांचा प्रस्ताव मी त्यावेळेस नाकारला होता. गेली 25 वर्ष राजकारणात असून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा आमचा निश्चय होता. राज्यात शेतकऱ्यांचे मुद्दे आम्ही नेहमीच मांडत आलो होतो. यापुढेही मांडू, शेतकऱ्यांचा न्याय देण्यासाठी आमच्याशिवाय कोणीही सक्षम नाही. त्यामुळे याआधीही अनेक पक्षांचे प्रस्ताव आम्ही फेटाळले, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
पैठण येथे महत्वाची बैठक संपन्न :स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण येथे राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. त्यात विविध ठराव राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. यामध्ये वीज दरवाढ विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, वीज कापली जाते तशी मोहीम सध्या राबवली जात आहे. ती थांबवावी, असे निर्णय या मेळाव्यात घेण्यात आले. तर वीज दरवाढ विरोधात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवावी, कांद्याचे गडगडलेले भाव, कापसाचे दर, पिक विमाचे पैसे, बुलढाणा येथील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची खाते निहाय चौकशी करावी. यासाठी 22 फेब्रुवारी रोजी सर्व प्रमुख रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली.