औरंगाबाद- शहरात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असणारी रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्या यंत्रणेच्या सहाय्याने मागील चार दिवसात कृत्रिम पावसासाठी फवारणी करण्यात आली. मात्र, फवारलेल्या रसायनाने रविवारी अवघे पाच मिनिटं पाऊस पडला आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ही यंत्रणा अपयशी होत असल्याचे समोर आलं आहे.
औरंगाबादमधील कृत्रिम पावसाचा प्रयोग पहिल्या चार दिवसात अपयशी
कृत्रिम पावसाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, मागील चार दिवसात फवारलेल्या रसायनाने रविवारी अवघे पाच मिनिटं पाऊस पडला. त्याखेरीज अद्याप कृत्रिम पाऊस पाडण्यास यंत्रणा कामी पडत नसल्याचे समोर आलं आहे.
शुक्रवारी औरंगाबाद येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. पाहिल्यादिवशी उपयुक्त ढग मिळाले नसल्याने विमान रिकाम्या हाताने परतले. ढग नसल्याने शनिवारी उड्डाण रद्द करण्यात आले. रविवारी विमान आकाशात झेपावले औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पाडण्यासाठी ढगांमध्ये केमिकल सोडण्यात आले. मात्र, पाच मिनिटांपेक्षा जास्त पाऊस पडला नाही. सोमवारी देखील आकाश स्वच्छ असल्याने पाऊस पाडता आलेला नाही. त्यामुळे शासनाने यंत्रणा बसवली असली तरी, पाऊस मात्र पाडता आलेली नाही. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग पहिल्या चार दिवसात अपयशी झाला असल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सरकारने कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय घेतला मात्र, प्रत्यक्षात यंत्रणा बसवण्यात दिरंगाई केली. जुलै महिन्यात प्रयोग सुरू व्हायचा तो प्रयोग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आला. जुलै महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात भिज पाऊस सुरू होता. त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडणार विमान अवकाशात झेपावले असते, तर कदाचित पावसाचा जोर वाढला असता आणि फायदा झाला असता. मात्र, सरकारी काम आणि काही दिवस थांब या वाक्याला साजेल असं काम पुन्हा एकदा झाले आहे. कृत्रिम पाऊस पाडणार विमान आकाशात झेपावल आणि सुरू असलेला रिमझिम पाऊस पण बंद पडला. कृत्रिम पाऊस पाडणार विमान आकाशात दोन दिवस उडाले. मात्र, आकाशात ढग नसल्याने रिकाम्या हातांनी परतले. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नात निकामी ठरला. पुढील दोन महिने तरी हा प्रयोग यशस्वी होईल का? याकडे मराठवाड्यातील जनतेचे डोळे लागले आहेत.