औरंगाबाद - शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यानेच माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सच्च्या शिवसैनिकेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचे संपूर्ण श्रेय हे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तींचे आहे. या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करून दाखविणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित मंत्री संदिपान पा. भुमरे यांनी बोलताना व्यक्त केला.
कॅबिनेट मंत्री संदिपान पा. भुमरे यांचे जंगी स्वागत आमदार संदिपान पा. भुमरे यांचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच शनिवारी मूळगावी पाचोड येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत बसस्थानक येथून गावापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्राम पंचायतीतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मंत्री भुमरे म्हणाले, मी बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आहे. मातोश्रीने दिलेले आदेश मी नेहमी तंतोतंत पाळले, ग्द्दारीपणा कधीच मनात आणला नाही. पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यानेच मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. मिळालेल्या या संधीचे सोने करत विकासकामे करून दाखविणार आहे. तसेच तालुक्यातील म्हत्त्वाची व तितकीच चर्चेतील ब्रम्हगव्हान सिंचन योजनाही लवकर पूर्ण केली जाणार आहे. तालुक्यातील उर्वरित राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
आत्तापर्यंत आपल्या आमदाकीच्या कारकीर्दीत पैठणनाथ मंदिरासाठी ३५ कोटी रूपये दिले. आपेगाव माऊलीसाठी १६ कोटी, पैठण शहरातील मौलाना दर्गासाठी ६५ लाख, शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृत्ती पुतळा, जिजाऊ मातेच्या स्मारकाला ९ गुंठे जमीन उपलब्ध करून दिली. याचबरोबर पाचोड पैठण ३ पदरी रस्ता मंजूर केला. पैठण औरंगाबाद व पैठण शहागड हा रस्ता बनवला. शिवाय तालुक्यात ९ गावांना भेडसवणारा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ९ उपकेंद्र मंजूर करून आणले. अशी, असंख्य कामे पूर्ण केली आणि यापुढे सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भुमरे म्हणाले.
हेही वाचा - चिठ्ठीमुळे महाविकास आघाडीला जिल्हा परिषद अध्यक्षपद
या कार्यक्रमास आमदार मोहन फड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, सामजिक कार्यकर्ते लेखराज जयस्वाल, माजी सरपंच अंबादास नरवडे, कौसर पटेल, अनिस कुरेशी, इरफान शेख, मूनवर सय्यद, सिद्धार्थ वाहुले, विशाल मोरे, उद्धव मगरे, शिवाजी पाचोडे, कादिर सय्यद, विकास धारकर, सिद्धार्थ मगर जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
हेही वाचा - 'माझा कंट्रोल थेट मातोश्रीवर, सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतरच देईल'