औरंगाबाद - शहरात ओबीसी बचाओ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार समीर बुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. औरंगपुरा भागात होणाऱ्या या मेळाव्यात औरंगाबादसह आसपासच्या शहरातून ओबीसी समाज बांधव दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या कोठ्यातून देऊ नये म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबादमध्ये ओबीसी बचाव मेळाव्याचे आयोजन; परवानगी नाकारूनही मेळाव्यास गर्दी - मराठा आणि ओबीसी आरक्षण
औरंगाबादमध्ये आज ओबीसी बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारूनही या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांनी गर्दी केली आहे.
बंजारा नृत्य करत बंजारा समाजाने मेळाव्यात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या वेशभूषेत ओबीसी समाजाच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, या मेळाव्याला आणि मोर्चाला ओबीसी समाज बांधवांनी गर्दी केल्याच दिसून आले आहे.
मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीला आरणला धक्का नको-
राज्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे अशीही मागणी काही संघटनाकडून राजकीय हेतूतून केली जात आहे. मात्र, मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण ओबीसी कोठ्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. यावर सरकारकडून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचा या आधीच खुलासा करण्यात आला आहे.