औरंगाबाद - कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता औरंगाबाद महानगर पालिकेने कोविड संदर्भात नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी शहरातील व्यापारी आणि मंगल कार्यालय यांना त्याबाबत इशारा देऊन नियमांचं पालन करा, अन्यथा कारवाईला तयार राहा, असा इशारा दिला आहे.
हॉटेल सुरू मात्र, खवय्ये नियम पाळत नाहीत..
दोन महिन्यांपूर्वी राज्यातील हॉटेल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हॉटेल सुरू करत असताना काही नियम अटी लावण्यात आल्या आहेत. मात्र त्या नियमांचा विसर पडल्याचं पाहायला मिळत आहे. हॉटेलमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांना आणि त्यांच्यामुळे इतर नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच नियमांचं पालन न करणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय व्यापारी वर्गाला दंड लावण्याचा इशारा - कोरोनाच्या महासंकटात नागरिकांनी धडा घेतला पाहिजे होता, मात्र तसं झालं नाही. मास्क हे सर्वात उपयोगी औषध आहे, असं म्हटंल जात असलं तरी अनेक नागरिक विनामास्क वावरत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी विनामास्क येणाऱ्या नागरिकांना दुकानात प्रवेश देऊ नये, अशा सूचना पालिकेकडून व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जे व्यावसायिक नियम पाळणार नाहीत, त्याचे दुकान काही दिवसांसाठी सील करण्यात येईल आणि दंड देखील लावला जाईल, असा इशारा पालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी दिला.
मंगल कार्यालयात नियमापेक्षा अधिक लोकांची गर्दी -
मंगल कार्यालयात कार्यक्रम घेत असताना दोनशेपेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल तसेच उपस्थितांनी मास्क घालणे सक्तीचे असताना देखील अनेक कार्यक्रमांमध्ये लोक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर नियमापेक्षा जास्त लोक कार्यक्रमात हजर राहून गर्दी करत आहेत ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. मंगल कार्यालय चालक याकडे लक्ष देत नसल्याचं निदर्शनास आल्याने मंगल कार्यालय चालकांना पालिका आयुक्तांनी इशारा दिला आहे. नियमांचे पालन होत का नाही, हे पाहण्यासाठी पालिकेचे पथक पाहणी करणार आहे. नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करून मंगल कार्यालय सील करण्याचा इशारा पालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी दिला. मात्र राजकीय कार्यक्रमात होणारी गर्दी आणि नियमांचं होणार उल्लंघन याबाबत मात्र आयुक्तांनी काहीच सांगितलं नाही.