औरंगाबाद- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉडाऊन असतानाही शहरातील काही नागरिक विनाकारण शहरात वावरताना दिसून आले आहे. त्यामुळे, एक एप्रिलपासून जिल्हा बंदी असणार असून या काळात वाहन घेऊन घराबाहेर वावरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी एक पत्रक काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी रिकामे फिरणाऱ्या अनेकांना लाठ्यांचा प्रसाद दिला, तर काही लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. मागील ५ दिवसांमध्ये १८९ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई असताना नमाज पठण करणाऱ्या २५ लोकांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचे गंभीर्य अद्याप लोकांना कळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, एक एप्रिलपासून औरंगाबाद पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.