औरंगाबाद- देशातील तीन काळे कायदे तेरा महिन्यात रद्द झाले. हमीभाव कायद्याबाबात अनेक चर्चा झाल्या मात्र, याबाबत कोणताही कायदा अद्याप आणला नाही. हमीभाव कायद्यासाठी मोठ्या लढाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारण्यासाठी संघर्ष करावे लागणार आहे, असे म्हणत नव्या आंदोलनाच्या तयारी संकेत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी औरंगाबादेत दिले.
आता लढा भाकरीसाठी -देशात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना शेतीपासून दूर नेत त्यांना मजूर करण्याचा डाव सुरू आहे. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात खाण्यायोग्य काही पिकणार नाही. सर्व बाहेरुन आणायचे, धान्यावर मालकी मिळवायची आणि मजुरांना भूक लागली की अन्नधान्याच्या किंमती ठरवायच्या, असा प्रयत्न या कंत्राटी शेतीमुळे होणार आहे. त्यामुळे आता भाकरीसाठीही लढा उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकऱ्यांसोबतच युवावर्गाचीही साथ तितकीच महत्त्वाची आहे, असेही टिकैत म्हणाले.