औरंगाबाद - जिल्ह्यात नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण 133 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातून 34, तर सर्वात कमी सात उमेदवार सिल्लोड विधानसभा क्षेत्रातून आहेत. मतदारांनी 21 ऑक्टोबर रोजी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात तीन हजार 24 मतदान केंद्रात एकूण 28 लाख 54 हजार 280 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रांपैकी 345 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग सुविधा उपलब्ध आहेत. 18 ठिकाणी सखी, 18 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारली आहेत. दिव्यांगांना मतदानासाठी अडचण होऊ नये, या दृष्टीने दिव्यांगांसाठी आवश्यक त्या सुविधाही मतदान केंद्रांवर आहेत. जिल्ह्यात एकूण 19 हजार 687 दिव्यांग मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये सर्वाधिक चार हजार दिव्यांग मतदार कन्नड विधानसभा मतदार क्षेत्रात आहेत. तर सर्वात कमी एक हजार 471 दिव्यांग मतदार औरंगाबाद पूर्व मतदार संघात आहेत.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल