औरंगाबाद - तांत्रिकबाबी तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना थांबवली आहे. मात्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. वॉटर ग्रीड योजनेत काही त्रुटी असल्याने या योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.
मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसाठी सर्व लोकप्रतिनिधींची २ फेब्रुवारीला बैठक आयोजित केल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दिली. शेतकरी आत्महत्या आणि शेतीसाठी लागणारे पाणी याबाबत करावे लागणारे उपाय याबाबत मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यासाठी असलेल्या योजना थांबवू नये, अशी मागणी एकत्रीतरित्या मुख्यमंत्र्यांकडे करण्याबाबत चर्चा करायची आहे. जेणेकरून विविध मागण्यांचा एकत्रित रेटा लावून धरता येईल, अशी माहिती प्रशांत बंब यांनी दिली.