औरंगाबाद- पंकजा मुंडे लवकरच शिवसेना प्रवेश करणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. पंकजा यांची फेसबुक पोस्ट आणि ट्विटरच्या बायोमधून त्यांनी भाजपचा उल्लेख हटवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास पंकजा यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पंकजा मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केले हे माहीत नाही. पंकजा भाजपातच लहानाची मोठी झाली आहे. तिचे वडील गोपीनाथ मुंडे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने पंकजा असे पाऊल उचलणार नाही, असे प्रकाश महाजन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मावळा असा उल्लेख केल्याने पंकजा भाजपला रामराम करून शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चा निरर्थक असून निवडणुकीत पराभव झाल्याने हताश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी तशी पोस्ट केली असल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये पंकजा नाराज असल्याच्या बातम्या आणि चर्चा सुरू आहेत. त्यात 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा खुलासा होईल, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पंकजा या भाजपच्या ओबीसी नेत्या आहेत. भाजपच्या काही समित्यांवर त्या नियुक्त असल्याने सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.