औरंगाबाद : ताब्यात घेतलेल्या वाहनाची नोंद न करणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. गुरुवारी मध्यरात्री औरंगपुरा भागातून पोलिसांनी एक दुचाकी ताब्यात घेतली. वाहनचालक सकाळी आल्यावर गाडी चोरीला गेल्याचा संशय त्याला आला. सीसीटीव्ही तपासला तेव्हा पोलिसांनीच वाहन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र त्याबाबत सिटीचौक पोलिसात नोंद नसल्याने या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अखेर पोलीस आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अशी घडली घटना: आशा ट्रेडर्स या औषधी दुकानात काम करत असलेल्या युवकाने, आपली गाडी बाहेर लावली होती. रात्री जाताना त्याने गाडी तिथेच ठेवली आणि मालकाची गाडी घेऊन घरी गेला. सकाळी आल्यावर त्याची गाडी जागेवर नसल्याने त्याने शोधाशोध केली. त्याने त्याठिकाणी लावलेले सीसीटिव्ही तपासले. रात्री अडीचच्या सुमारास पेट्रोलिंग गाडीमधून आलेल्या पोलिसांनी दुचाकी नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिटीचौक पोलिसात विचारणा केली करण्यात आली. परंतु कुठलीही नोंद आढळून आली नाही. मात्र पोलीस स्टेशन आवारात दुचाकी उभी असल्याचे समोर आले. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना देखील माहिती नसल्याने पोलिसांनीच वाहन चोरल्याची चर्चा रंगली आहे.