औरंगाबाद - पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी तयारी करत आहेत. मात्र गेल्या ३ वर्षांपासून राज्यात पोलीस भरतीच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया नसल्याने राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये निराशा येत असल्याच दिसून येत आहे.
तीन वर्षांपासून पोलीस भरती रखडलेलीच; युवक, प्रशिक्षक हवालदिल तीन वर्षांपासून युवक भरतीच्या प्रतीक्षेत -
गेली 3 वर्ष राज्यात केवळ पोलीस भरतीच्या घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मात्र भरती प्रक्रिया बंद आहे. यामुळे राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण निराश झाले आहेत. तयारी करून भरती होत नसल्याने आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास या तरुणांना सहन करावा लागतोय. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तरुण मुले तयारी करत आहेत. पहाटे उठून मैदानी परीक्षेसाठी तयारी करण्यापासून ते लेखी परीक्षेसाठी बौद्धिक तयारी करण्यामध्ये यांचा दिवस निघून जातो. पोलीस भरतीसाठी वयाची अट असल्यामुळे प्रत्येक संधी ही शेवटची संधी असते. असे समजून पोलीस दलात भरतीसाठी तयारी करणारे तरुण आता हतबल झालेत. असे प्रशिक्षक यांनी सांगितले.
प्रशिक्षक देखील बेरोजगार होण्याची शक्यता -
विद्यार्थ्यांप्रमाणेच पोलीस भरतीचा फटका पोलीस प्रशिक्षण क्लास चालकांना सुद्धा बसला आहे. त्यामुळे आता क्लास बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलीस होण्याचे स्वप्नं पाहणारे मुले प्रचंड कष्ट करून सराव करत आहेत. गेल्या तीन वर्षात पोलीस भरती नाही. त्यात पुन्हा कोरोना आला सर्वत्र निर्बंध आले. त्यात नव्या भरतीच्या आशा ही मावळल्या. आता पुन्हा सप्टेंबरमध्ये भरती होण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व मुले तयारी करत आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका म्हणून राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी भरती होणार की पुढे ढकलली जाणार. याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे या मुलांचे स्वप्न पूर्ण होणार की फक्त स्वप्नच राहणार हा प्रश्न सर्वासमोर आहे. असे मत प्रशिक्षक व्यक्त करत आहेत.
असंख्य तरूण हे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत -
वडिलांनी आयुष्य शेतात राब-राब राबवून मुलाचे शिक्षण केले. मुलगा काही तरी करेल म्हणून आजही आपल्या 4 एकर शेतात रात्रीचा दिवस करून मेहनत करत आहेत. आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी विकास सुद्धा गेल्या पाच वर्षांपासून पोलीस भरतीचा सराव जोमात करतोय. आतापर्यंत दोनदा भरती मारलेल्या विकासला यश आले नाही. पण त्याची जिद्द अजूनही कायम आहे. मात्र सरकारच्या उदासीन धोरणासमोर त्याची जिद्द कमी पडतेय. असंख्य तरूण हे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार पोलीस भरती प्रक्रिया राबवत नाही. अशी खंत औरंगाबादच्या विकास पवार या युवकाने व्यक्त केली आहे.