औरंगाबाद : 'पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया' अशा निनावी फोन कॉलने पोलिसांची धावपळ उडवली. जवळपास चार तास तपासणी केल्यावर असे काहीच नसल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा फोन एका विशिष्ठ ॲपद्वारे आपली ओळख लपवून करण्यात आला. विशेष म्हणजे फोन करणाऱ्याने न्यायालयात वकिली करणाऱ्या अॅड.दत्तात्रय जाधव यांना नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर मात्र त्यांना याबाबत माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
फोन आल्याने उडाली धावपळ: एका अज्ञात फोन कॉलने औरंगाबाद शहर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. फोन करणारी व्यक्ती हिंदीत संभाषण करत होती. त्यावेळी 'पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया' असे सांगितले. न्यायालय बंद होण्याची वेळ असल्याने न्यायाधीश, वकील, कामकाजासाठी आलेले नागरिक न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या फोन मुळे पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांची तपास मोहिम : पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक राज्यश्री आडे यादेखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखल झाल्या. न्यायालयात तपास कार्य सुरू करण्यात आले. पहिल्या मजल्यापासून तर खालपर्यंत सर्वत्र शोधाशोध घेण्यात आली. तीन ते चार तास तपास मोहीम केल्यावर त्यात काही तथ्य नसल्याचा निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.