औरंगाबाद -लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना थांबवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले असताना औरंगाबादेत चक्क या लोकांना बंदिस्त केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईहून मध्य प्रदेशला आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या ४० लोकांना पोलिसांनी जिल्ह्याच्या वेशीवर अडवले. यानंतर त्यांना गारखेडा येथील महानगर पालिकेच्या शाळेत आणण्यात आले. तसेच ते निघून जाऊ नये, यासाठी शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले आहे. संबंधित शाळेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या मजुरांची गैरसोय झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आहे त्या जागीच राहण्याच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र हातावर पोट असलेल्या अनेकांनी आपल्या घरचा रस्ता जवळ करायला सुरुवात केली आहे. तसेच गावी जाण्यासाठी गाडी मिळत नसल्याने अनेकांनी पायीच आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
अशा लोकांची राहण्याची व अन्नाची सोय स्थानिक जिल्हा प्रशासनाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र औरंगाबादेत पायी जाणाऱ्या लोकांना चक्क बंदिवासात ठेवल्याचे समोर आले आहे. मुंबईहून मध्य प्रदेशला निघालेल्या 14 जणांना पोलिसांनी पंढरपूरात अडवले. तर जळगावहून सांगलीकडे निघालेल्या 22 लोकांना हर्सूल येथे पोलिसांनी पकडले. यानंतर सर्वांची रवानगी गारखेडा येथील महानगर पालिकेच्या शाळेत करण्यात आली. तसेच हे लोक कोठेही जाऊ नये, यासाठी संबंधित शाळेला कुलूप लावण्यात आले आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही आवश्यक सेवांचा पुरवठा होत नसल्याने या कामगारांनी संताप व्यक्त केलाय.
हे सर्वजण मुंबईत वाहन चालकाचे काम करत असून हाताला काम नसल्याने त्यांनी घरचा रस्ता धरलाय. तर जळगावहून सांगलीला जाणारे सर्वजण जळगावात मार्केटिंगचे काम करतात. सोशल मीडियावर लॉकडाऊन अजून एक ते दीड महिना वाढणार असल्याचे मेसेज आल्याने भयभीत झालेल्या 22 जणांनी पायीच सांगलीची वाट धरली. आता पोलिसांनी रस्त्यात आडवल्याने त्यांना शाळेत राहावे लागत आहे. आम्हाला आमच्या घरी पोहचवा, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.