औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात एका घरात चोरून खोदकाम करत असताना गुप्तधन किंवा नरबळी देण्याच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
औरंगाबादमध्ये एका घरात चोरून खोदकाम चौधरी कॉलनी परिसरात आसाराम सपकाळ यांच्या घरात काही दिवसांपासून मध्यरात्री खोदकाम होत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी पाळत ठेवली होती. त्यानुसार सिडको एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
रविवारी रात्री १२ च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा मारला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या घरात समोरील बाजूने ४ बाय ४ चा तीन फूट खोल असा खड्डा तर मागील बाजूस ५ फूट खोल असा खड्डा खोदण्यात आल्याचा दिसून आले. घर मालकाला त्याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला.
यावेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकाला ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांनी कारवाई करत असताना घाई केल्याने मांत्रिक पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून मांत्रिकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, याबाबत लावलेले आरोप आसाराम सपकाळ यांनी फेटाळले आहेत. घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम केल्याचा दावा सपकाळ कुटुंबीयांनी केला आहे.