छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला 60 ते 80 लाख रुपयांची काळा पैसा जमा केला जात असल्याचा आरोप करत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आता पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या जागी मनोज लोहिया यांना आयुक्त बनवण्यात आले आहे.
विरोधीपक्ष नेत्यांनी केला होता आरोप : विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता अवैध धंद्यांना चालना देत असल्याचा आरोप केला होता. शहरात अवैध पद्धतीने गुटखा विक्री, मटका, दारू, वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पैश्यांची घेवाण देवाण घेऊन अवैध धंदे सुरू आहेत. वसुलीसाठी काही अधिकारी नेमले आहेत तर खाजगी लोकांच्या माध्यमातून देखीलही वसुली केली जात आहे. इतकेच नाही तर कोणत्या अवैध धंद्यातून किती पैसे जमा केले जातात, याबाबतची आकडेवारी सह माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केली आहे. याबाबत गृह विभागाने लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा, असेही दानवे यांनी सांगितलं होते.