औरंगाबाद - अवैधरित्या गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांना गुरुवारी (22 एप्रिल) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 15 लाख 49 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विजय संजय ठाकरे (वय 25. रा.अजनाळे ता.जि. धुळे), अवेज खान महेमुद खान (वय 27. रा. मोमीनपुरा लोटकरांजा) आणि महंमद इद्रीस महंमद इसा (वय 35. रा. गरमपाणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना ओडिशा येथून चिकलठाणा दिशेने तिघेजण गांजा घेऊन येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला. यावेळी झाल्टा फाटा केंब्रिज मार्ग चिकलठाणा येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिघांना ताब्यात घेऊन झडती केली. या कारवाईत ९ लाख रुपये किमतीचा 47 किलो 193 ग्रॅम गांजा मिळून आला. त्यांच्या ताब्यातून एकूण किंमत १५ लाख ४९ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.