औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर येथील जैन मंदिर चोरी प्रकरणाचा ( Jain temple theft case ) पोलिसांनी खुलासा केला आहे. मंदिरातील सेवेकरीच चोर निघाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. मुख्य आरोपीसह एकाला मध्यप्रदेशमधून अटक ( Police arrested accused from Madhya Pradesh ) करण्यात आली आहे. मंदिरातील दोन किलोची सोन्याची मूर्तीची अदलाबदल करून, त्यातून आलेल्या पैश्यातून आरोपी यांनी स्वतःवरील कर्ज फेडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
दोन सेवेकरी अटकेत : अर्पित नरेंद्र जैन (वय 32 वर्ष रा. शिवपुरी जि. गुणा,मध्यप्रदेश) आणि अनिल भवानीदिन विश्वकर्मा (वय 27 वर्ष रा. शहागड जि. सागर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या सेवेकरी आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचनेर येथील जैन मंदिरातील चोरी प्रकरणी चिखलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलिसांचे वेगवेगळे पथ नेमण्यात आले होते. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रीक विश्लेषणावरुन ही चोरी अर्पित नरेंद्र जैन याने केली असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन अर्पित नरेंद्र जैन याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपला साथीदार अनिल भवानीदिन विश्वकर्मा याच्या मदतीने सोन्याच्या मूर्तीची अदलाबदल केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.