औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पक्ष, संघटना, कार्यकर्त्यांनी कोरोना आजाराच्या परश्र्वभूमीवर प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात न येता राहत्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त मीना मकवाना यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र कोरोना आजाराची परिस्थिती लक्षात घेता अनुयायांनी विद्यापीठात येऊन अभिवादन न करता घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त मीना मकवाना यांनी केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातून येतात अनुयायी -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट अनुयायांसाठी अत्यंत श्रध्देचे स्थान आहे.यामुळे विद्यापीठ गेट परिसरात सकाळ पासुन अनुयायांची रिघ लागलेली असते. यासाठी मराठवाडयातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच पुणे, अहमदनगर, बुलढाणा आणि औरंगाबाद ग्रामिण भागातुन आंबेडकर संघटनांचे कार्यकर्ते सहभाग घेतात. विद्यापीठ गेटसह अनेक ठिकाणी मिठाई, साखर, अन्नदान करुन आनंद व्यक्त केला जातो तसेच अनेक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.