औरंगाबाद- भाजपचा एकच नारा आहे, सर्व काश्मीर आमचा आहे. आर्टिकल ३७० हटवले आता पाकव्याप्त काश्मीर बाबत काय? असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले जातात. त्या वेळेस आम्ही एकच उत्तर देतो की, सबका नंबर आयेगा, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी जिल्ह्यात केले आहे.
काश्मीर व कलम ३७० बद्दल संबोधन करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव काश्मीरमधून आर्टिकल ३७० हटवल्याने देशातील सर्वच विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये आर्टिकल ३७० वर सर्व लोकांना जागृत करण्यासाठी भाजपने विशेष यात्रेचे आयोजन केल आहे. या यात्रेच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव औरंगाबादेत आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थितांना आर्टिकल ३७० देशासाठी किती घातक होता. या आर्टिकलमुळे काश्मीरचा विकास कशा पद्धतीने खुंटला होता. हे आर्टिकल काढणे का गरजेचे होते. याबाबत पक्षाचे ध्येय धोरण राम माधव यांनी मांडले.
काश्मीरच्या विकासासाठी नवीन योजना आखण्यात आल्या आहेत
जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७० नुसते हटवले नसून यानंतर त्या पूर्ण भागाच्या विकासासाठी नवीन योजना आखण्यात आल्या आहेत. आणि त्यामुळे काश्मीरचे एक नवे रूप आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या नागरिकांना मूलभूत अधिकार दिले जात नव्हते. या सर्व बाबींचा विचार केला गेला होता. म्हणूनच आर्टिकल ३७० हटवण्यात आले. ज्यावेळेस आर्टिकल ३७० लागू झाले. त्यानंतर त्या भागामध्ये कोणताही मोठा गुंतवणूकदार गेला नव्हता. त्यामुळे तिथे कोणताही नवा उद्योग येऊ शकला नाही, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केले.
हेही वाचा-राज्यात असदुद्दीन ओवैसींची तोफ धडाडणार, आठ ठिकाणी घेणार प्रचार सभा
अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जातीच्या लोकांसाठी कुठलेच अधिकारी नव्हते
जम्मू काश्मीरमध्ये अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जातीच्या लोकांसाठी कुठलेच अधिकार दिलेले नव्हते. त्यांना आजपर्यंत अद्याप कुठलाही राखीव कोटा दिलेला नव्हता. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतला देखील कुठलेच अधिकार नव्हते. तिथले ग्रामपंचायत सदस्य तिथल्या आमदारांच्या पायाशी पडलेला राहायचे. मात्र, आता तसे होणार नाही. आर्टिकल ३७० हटवल्यानंतर आता आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये विकासासाठी देणार आहोत.
काश्मीरमध्ये आधी पुरुषांना देशा विदेशातल्या कुठल्याही स्त्रीशी विवाह करण्याची परवानगी होती. मात्र, तशी परवानगी महिलांना नव्हती. जर एखाद्या महिलेने काश्मीरच्या बाहेर एखाद्या माणसाशी लग्न केले, तर त्याचे सर्व अधिकार हिरावले जात होते. मात्र, आता तसे होणार नाही. कलम ३७० लावल्यानंतर ओवेसींना दुःख झाले होते. कोणी मारेल अशी भीती त्यांना वाटत होती, मात्र त्यांना सांगू इच्छितो की, दंगा करणारे आम्ही नाही, दंगा करणारे मजलीस आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला राम माधव यांनी ओवेसी यांना लगावला.
इंटरनेटची सेवा अनेक वेळा बंद करण्यात आली, ते काही नवीन नाही
आर्टिकल ३७० मध्ये ४५ वेळा बदल करण्यात आले. मात्र, बदल करताना जी पद्धत अवलंबली गेली होती त्याच पद्धतीने आम्ही ३७० आर्टिकल हठवले. आणि ते देखील राज्याचा हितासाठी, असे देखील राम माधव यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केले. आज जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य असल्याचा आरोप केला जातो. मात्र, तिथे अशा पद्धतीचे सैन्य हे आधीपासूनच आहे. आणि इतकेच नव्हे तर इंटरनेटची सेवा अनेक वेळा बंद देखील केली जात होती. त्यामध्ये नवे असे काहीच नसल्याचे देखील राम माधव यांनी सांगितले.
हेही वाचा-अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे बंड
पाकिस्तानच्या चष्म्यातून भारताने काश्मीरच्या मुद्याकडे पाहायची गरज नाही
प्रत्येक वेळेस पाकिस्तानच्या चष्म्यातून भारताने काश्मीरच्या मुद्याकडे पाहायची गरज नाही. हा भाग आपला आहे. आपण काय निर्णय घ्यायचे हे आपणच ठरवले पाहिजे. त्यामुळेच भारताने आर्टिकल ३७० हटवल्यानंतर कुठलाच देश पाकिस्तानला साथ द्यायला तयार नाही. फक्त चीनने त्यासंबंधी एक प्रस्ताव ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, तो प्रस्ताव देखील इतर देशांनी ठेवण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. 'काश्मीर हमारा है और साराका सारा हमारा है', असा नारा असून पाकव्याप्त काश्मीरबद्दल आम्हाला बोलले जायचे. त्यावेळेस आम्ही एकच सांगतो की, सबका नंबर आयेगा, असे म्हणत राम माधव यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.