औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत आहेत. यातच सिल्लोड येथील चारा छावणीवर लावण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अब्दूल सत्तार यांचा फोटो असल्याचे दिसत आहे. यामुळे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी शनिवारी नगर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयासोबत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा राजकीय मार्ग नेमका कुठला असणार, याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.
सिल्लोड तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. चारा छावणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अब्दुल सत्तार यांचा फोटो असलेले बॅनर छावणीवर लावल्याने अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ऐन निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात काम केले. या दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेटीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. मात्र, सिल्लोड येथे चारा छावणीवर मुख्यमंत्र्यांसोबत असलेले बॅनर वरील फोटो, आणि नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयासोबत राहण्याचे केलेले वक्तव्य यामुळे अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र असे असले तरी याबाबत अब्दुल सत्तार कुठलीही अधिकृत माहिती देत नाहीत, पण त्यांचा भाजप प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.