औरंगाबाद - मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहे. अनेक ठिकाणी महामार्गांवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर छोटेमोठे प्रकल्प भरल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार तर अनेक ठिकाणी सोमवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून मंगळवार (दि. 28 सप्टेबर) पाऊस सुरुच आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात असणाऱ्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असून जवळपास धरणात 85 टक्के इतका जलसाठा असून पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास दोन ते तीन दिवसांमध्ये धरण भरण्याची शक्यता आहे. नांदेड येथी विष्णुपुरी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणाचे 8 दरवाजे उघडले आहेत. या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जातोय. परभणीत जिल्ह्याने पावसाची यंदा विक्रमी नोंद झाली आहे. आतापर्यंत 1041.3 मिलीमीटर पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 139.9 टक्के आहे. गतवर्षी 27 सप्टेंबरपर्यंत 827 मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे 1 हजाराचा ओलांडलेला पल्ला हा विक्रमी ठरला आहे. तालुक्यातील जोगवाडा शिवारातील तलाव अतिवृष्टीमुळे तुडुंब भरला. याचे पाणी शेतशिवारात शिरल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.