औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात घरी बसून टीव्ही आणि मोबाईलचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र यामुळे आता डोळ्यांच्या समस्या वाढत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डोळ्यांच्या समस्या येण्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. सतत मोबाईल खेळणे, टीव्ही पाहणे यांमुळे डोळ्यांवर येणारा ताण वाढत आहे. त्यामुळे या समस्या प्रामुख्याने उद्भवत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले.
लॉकडाऊनचा असाही परिणाम; स्क्रिनबरोबर संपर्क वाढल्याने डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घरात आहेत. घरातच वेळ घालवायचा म्हणून मोबाईलवर खेळ खेळणे, वेब सिरीज पाहणे, टीव्ही पाहणे, रात्रभर मोबाईल हाताळणे त्या माध्यमातून सोशल मीडियावर वेळ घालवणे असे अनेक प्रकार लोक करत आहेत. यात लहान मुलांचा सहभाग आहेच. अगदी मुलांचे क्लासेस सुद्धा मोबाईलवर सुरू आहेत. यामुळे डोळ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.
डोळे लाल होणे, पाणी येणे, दुखणे या समस्या वाढल्या आहेत. अनेकांचे डोळे लाल व्हायला सुरुवात झाली आहे आणि याचे कारण ठरले लोकांचा वाढलेला स्क्रीन टाईम, म्हणजे मोबाईल, कॉम्प्युटर वा टीव्ही यात घालवण्यात येणारा वेळ. त्यामुळे डोळ्यांबाबत डॉक्टरांकडे तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत. डोळे लाल होणे, कोरडे होणे आणि काही इतरही त्रास होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.
अशी घ्यावी काळजी -
1) कम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करताना प्रत्येक अर्ध्या तासाला विश्रांती घेणे.
2) काम करत असताना डोळ्यांची उघड झाप कमी होते त्यामुळे ताण वाढतो. म्हणून काम करताना डोळ्यांची उघडझाप वाढवावी.
3) ऑनस्क्रीन काम करताना 20-20-20 नियम पाळावा. म्हणजेच प्रत्येक वीस मिनिटांनी, 20 मीटर लांब, 20 सेकंद पाहावे.
4) डोळे कोरडे पडत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप टाकावा.
5) "अ" जीवनसत्व मिळेल असे पदार्थ खावे ज्यात पपई, अंडी, गाजर, मासे, मीठ यासारख्या फळांचा आणि पदार्थांचा समावेश आहे.
6) मोबाईल किंवा कम्प्युटरचा ब्राईटनेस कमी करावा.
7) मोबाईल किंवा कम्प्युटर डोळ्यांच्या लेव्हलला असावे.
8) जास्त त्रास वाटत असेल तर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा काही गोष्टींचे पालन केल्यास आपले डोळे चांगले ठेवण्यास मदत होईल, असे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राजीव मुंदडा यांनी व्यक्त केले.