औरंगाबाद - पालघर जिल्ह्यात ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात दोन साधूंसह एका वाहन चालकाची हत्या झाली होती. तशाच प्रकारच्या हल्ल्याचा प्रकार पैठण तालुक्यातील जांभळी गावात घडला आहे. मात्र, या हल्ल्यात साधू गिरी महाराज यांनी कसाबसा आपला जीव वाचवला आहे. जांभळीच्या राम टेकडीवर गणेश गिरी महाराज यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. जवळपास 150 हुन अधिक गावकरी महाराजांवर चालून गेले होते. हल्ल्यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
माहिती देताना गणेश गिरी महाराज महाराजांचा व्हिडिओ व्हायरल
महाराजांवर गावकरी हल्ला करण्यासाठी आले असताना महाराजांनी चक्क तलवार हातात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराज दोन हातात दोन तलवारी घेऊन गावकऱ्यांशी वाद घालत आहेत. त्याचबरोबर, गावकरी महाराजांना दगडाने मारहाण करतानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. माझ्यावर दीडशे ते दोनशे लोक चालून आल्याने स्वरक्षणासाठी हातात तलवार घ्यावी लागली. मात्र, मला दगडाने मारहाण केल्यावर मला तलवार टाकून पळावे लागले, असे स्पष्टीकरण गणेश गिरी महाराजांनी दिल.
हेही वाचा -2028 साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारत पहिल्या दहा देशात येईल- किरण रिजीजू
एक दिवस आधी झाला होता वाद
घटनेच्या एक दिवस आधी एक गाय टेकडीवर चरायला गेली होती. त्यातून या महाराजांनी एका वृद्धाला काठीने मारहाण केली होती. याचाच जाब विचारायला गावकरी गेले होते. मात्र, महाराजांनी तलवारी उपसल्याने संतप्त गावकऱ्यांनी महाराजांना मारहाण केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.
महाराज गंभीर जखमी
झालेल्या वादानंतर गावकऱ्यांनी मिळेल त्या वस्तूंनी महाराजांवर हल्ला केला होता. त्यात महाराजांना दगडसुद्धा फेकून मारले. त्यानंतर महाराजांनी छोट्या टेकडीवरून उडी मारली आणि कसाबसा जीव वाचवत पळ काढला. या हल्ल्यात गणेश गिरी जबर जखमी झाले आहेत. त्यांच्या दोन्ही हातांना आणि उजव्या पायाला, डोक्याला मार लागला आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलीस घटनेचा तपास करत आहे.
पालघरमध्ये २ साधूंचीही झाली होती हत्या-
साधूवर अशा प्रकार हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे १६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर-दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालकांना ठार मारले होते. हे तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावात सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी या गडचिंचले या गावातील नागरिकांनी या सांधूंच्या गाडीवर हल्ला करून त्यांना ठार मारले. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मेला गडचिंचले येथील घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.
नांदेडच्या उमरीमध्येही झाली होती मठपतीची हत्या-
मे महिन्यात उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठपती गुरुनिर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांसह अन्य एका भक्ताची रविवारी(२४ मे) पहाटे दोनच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे यास तेलंगणातील तानूर येथून अटक केली होती.
हेही वाचा -कोरोनाच्या रुग्णाच्या शरीरात पस, भारतातील पहिलाच रुग्ण