औरंगाबाद - एखाद्याला कोरोना झाला, तर त्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात पाठवलं जाते आणि त्याच्या कुटुंबीयांना एका प्रकारे वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, औरंगाबादच्या सिडको परिसरात एका फ्लॅटमध्ये कोरोनाबाधित मुलीवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी सोसायटीतील नागरिक त्या कुटुंबाला मदत करत आहेत.
'हमे बिमारी से लढना है, बिमार से नही', नागरिकांनी भीती ना बाळगता कॉलनीत कोरोनाबाधिताची केली व्यवस्था सिडको एन ४ भागात तिरुपती पार्क येथे राहणारी एक व्यक्ती कामानिमित्त नांदेडला गेली. तिथे गेल्यावर त्यांना त्यांची प्रकृती खराब होत असल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले आणि उपचार सुरू झाले. मात्र, त्यांच्या पत्नीने खबरदारी घेत घरातील इतर सदस्यांची चाचणी करून घेतली. त्यात त्यांच्या ११ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कुठल्याही प्रकारची लक्षणे नसल्याने घरी उपचार घेणे शक्य आहे, असे डॉक्टरांनी सुचवले. मात्र, घरात उपचार घेताना इतर सदस्यांना बाधा होण्याची भीती आहे. त्यात मुलगी लहान असल्याने तिला एकटे सोडणे शक्य नव्हते. असा संभ्रम असताना त्या राहत असलेल्या कॉलनीतील नागरिकांनी मात्र न घाबरता त्यांना साथ दिली.
कॉलनीत असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमध्ये त्या मुलीला उपचारासाठी ठेवता येईल, असा विचार काही सदस्यांनी मांडला. घर मालकाने देखील त्याला परवानगी दिली. त्याच वेळी फ्लॅटमध्ये काही काम करणे गरजेचे होते. सोसायटीच्या लोकांनी ती काम त्वरित करून घेतली. त्या कोरोनाबाधित मुलीला त्या ठिकाणी ठेवले. मुलगी लहान असल्याने तिच्या आईने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सोसायटीच्या नागरिकांनी तातडीने गॅस आणि किराणा सामान भरले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. आई मुलीसोबत राहत असल्याने घरातील इतर सदस्यांचे जेवणाचे हाल होणार नाही, याची कॉलनीतील नागरिकांनी काळजी घेतली. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची काळजी कॉलनीतील नागरिक घेत आहेत.
उपचार घेणाऱ्या मुलीला आणि आईला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू कॉलनीतील लोक पुरवत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत लढण्याचे बळ त्या चिमुकलीला नक्कीच मिळत आहे. मंगळवारी मुलीचे वडील कोरोनाचे युद्ध जिंकून परत घरी आले आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत मुलगीही ही लढाई जिंकेल यात शंका नाही. मात्र, कोरोनाच्या या भीतीदायक काळात नागरिकांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद आहे. "हमे बिमारी से लढना है बिमार से नही" हे वाक्य नागरिकांनी नक्कीच सार्थकी लावले आहे. इतर नागरिकांनी देखील या नागरिकांचा आदर्श घेतला, तर या आजाराला हरवणं शक्य होईल हे मात्र तितकंच खरं.