औरंगाबाद -जुन्याकाळी एखाद्या श्रीमंत घरात आनंदाची बातमी असली की गावभर साखर वाटली जायची. तसच काहीसे औरंगाबाद जिल्ह्यात घडलं आहे. कोरोनाच्या कठीण काळातही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरल्याने साखर स्वस्तात वाटण्यात आली आहे. आपल्या नेहमीच्या वेगवेगळ्या उपक्रमांने चर्चेत असणारे पाटोदा गाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी दिवाळी निमित्ताने आपल्या गावकऱ्यांसाठी गोड निर्णय घेतला. पेरे यांनी गावकऱ्यांना दिवाळीसाठी बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे.
सरंपचांनी गावात स्वस्तात साखर वाटली पाटोदा गावाची 'आदर्श ग्रामपंचायत' म्हणून राज्यात ओळख -
गावातील विविध उपक्रमाची राज्यातील इतर ग्रामपंचायती आदर्श घेतात. तर अनेक लोकं या गावाची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी राज्य बाहेरून सुद्धा येतात. तर सरपंच पेरे यांच्या भाषणांची सोशल मीडियावर एक वेगळीच ओळख आहे. त्याचप्रमाणे आता पेरे यांनी गावकऱ्यांना साखर वाटप करण्याचा घेतलेला गोड निर्णय सुद्धा आता चर्चेचा विषय बनला आहे.
शंभर टक्के कर भरल्याने गावकऱ्यांची दिवाळी गोड -
पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. जवळपास साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श घालून दिला आहे. गावकऱ्यांच्या कामगिरीमुळे सरपंच पेरे आणि त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा आपल्या गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे ठरवले. कोरोनाच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबीयांना ग्रामपंचायतने बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. प्रत्येक घरात 25 किलो साखर या दराने देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी दिवाळीच्या आधी करण्यात आली.
कोविडमुळे अनेकांचा रोजगार गेला, मात्र कर भरला -
पाटोदा गाव वाळूज एमआयडीसीजवळ असल्याने अनेक गावकऱ्यांची उपजीविका परिसरात असलेल्या कंपन्यांवर अवलंबून आहे. मात्र, कोरोनाचे संकट आल्यानं अनेकांचे रोजगार गेले. तर काहींची पगार कपात झाल्या. तर बरेच गावकरी छोटे-मोठे व्यवसाय करतात. कोरोनाचा फटका त्यांनाही बसला होता. यामुळे गावची अर्थव्यवस्थाही बिघडली. ग्रामपंचायत कर गावकऱ्यांनी भरला असल्याने वीस रुपये किलो साखर मिळाल्यानं गावकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी निर्णय -
कोरोना संकटात ग्रामपंचायतीचा कर जर गावकऱ्यांनी भरला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहिला पाहिजे. देशात असलेलं आदर्श गाव म्हणून निर्माण झालेली ओळख गावकऱ्यांशीवाय शक्य नाही. कर भरल्याने गावातील लोकांना सुविधा तर देता येते. अडचण असताना देखील नागरिकांनी कर भरला, त्यांची देखील दिवाळी गोड व्हावी. त्यामुळे, ही संकल्पना पुढे आल्याचं सरपंच भास्कर पेरे यांनी सांगितलं.