औरंगाबाद- मराठवाड्यातील पाणी प्रश्नांसह अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे येत्या २७ जानेवारीला शहरात येणार आहेत. त्या शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणाच्या निमित्ताने पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असे समजते.
माहिती देताना भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर उपोषणासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते हरिभाऊ नाना बागडे, रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व नेते व अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्यामुळे, सकारात्मक भूमिकेतून हे लाक्षणिक उपोषण असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन व मराठवाड्याच्या प्रत्येक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होणे हे लाक्षणिक उपोषणाचे प्रमुख मुद्दे असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली. उपोषणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, सत्ता पक्षाचे मंत्री यांचे मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात लक्ष वेधले जाणार आहे. मराठवाड्यात पाणी नसल्यामुळे शेती नाही, शेती नसल्याने पीक नाही, पीक नसल्यामुळे पैसे नाहीत, पैसे नसल्यामुळे अठराविश्व दारिद्र्य आहे, त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षण व पोषणावर होत आहे. शिक्षण असले तरी रोजगार नाही, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यामुळे मराठवाड्यातील जनता स्थलांतरित होत आहे. मराठवाड्यातील सिंचनाचा व विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विशेष लक्ष देतील ही रास्त अपेक्षा पंकजा मुंडे यांना असल्याचे बोराळकर यांनी सांगितले.
विविध राजकीय पक्षांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि विविध मान्यवरांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एक येणे ही काळाची गरज आहे. यासाठी राजकीय पक्ष, माध्यमे आणि सेवाभावी संस्था यांची मोट बांधणे आवश्यक आहे. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देते. पण, मराठवाड्याच्या जनतेला कायमस्वरूपी स्वावलंबी बनवण्यासाठी शेतीला पाणी असणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील रस्ते, रेल्वे, उद्योग, रोजगार आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत युती सरकारने मागील पाच वर्षाच्या काळात कसोशीने प्रयत्न केले. आता सत्ता पक्षानेही या बाबीवर लक्ष देऊन भविष्यात यशस्वी व जलद निर्णय घेणे आवश्यक आहे. तरीही सर्वांनी विविध मागण्यांसाठी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा-'मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अगोदर केंद्रात बिल मंजूर करा'