औरंगाबाद- मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर मात करावी. यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून उपखोऱ्यात वळविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत दिली.
पाणी प्रश्नांवर पंकजा मुंडे आग्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रस्ताव दिला असून त्यासाठी जवळपास 6 हजार कोटींची गरज लागणार आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी जवळपास 4 वर्षे लागतील. त्यामुळे मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील धरणे कोरडी पडल्याने अवर्षणाची स्थिती असते. सिंचनाची खात्रीशीर सोय उपलब्ध नसल्याने हा भाग कायम दुष्काळी असतो. नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे अंदाजे 10 हजार 454 दलघमी पाणी पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे समुद्राकडे वाहून जाते. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस 623 लहान-मोठी धरणे असल्यामुळे जायकवाडी प्रकल्प देखील प्रत्येक वर्षी पुर्ण क्षमतेने भरत नाही. यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे 3 हजार 178 दलघमी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणे प्रस्तावित आहे. यापैकी 570 दलघमी पाणी जायकवाडी धरणस्थळी उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला होईल, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6 हजार 700 कोटी खर्च अपेक्षित असून, योजनेचे सर्वेक्षण तत्काळ करावे व त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात बैठक बोलावली असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.