औरंगाबाद - अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याच्या वाटपाबद्दलची माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कुठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. या साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्यालादेखील वाटप केले. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपीठाने दिले आहेत.
औरंगाबाद खंडपीठात दाखल होती याचिका -
सुजय विखे यांनी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणत्याही परवानगीशिवाय व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातून खरेदी केली असावी, हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त आहे, असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही. एवढा मोठा इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशोबदेखील कुठे नाही, अशा प्रकारची याचिका सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले. याप्रकरणाची पुढील सुनवाई २९ एप्रिल रोजी होणार आहे.
हेही वाचा - आत्महत्येसाठी २२ वर्षीय तरुणी चढली इमारतीवर, पोलिसांनी समजून घालण्याचा केला प्रयत्न