छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :औरंगाबादशहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची आमची मागणी पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्राने तो मंजूर केला. त्यामुळे आम्ही राज्य आणि केंद्र सरकारचे अभिनंदन देखील केलेले आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या परिस्थितीबाबत आंदोलन करणाऱ्या पक्षांना जनतेशी देणे घेणे नाही. मात्र लोकांनाही यांच्याशी घेणे देणे राहिलेले नाही. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, अशी भाजप आणि एमआयएमची भूमिका आहे. एकाने आंदोलन केले की, लगेच त्यावर दुसरा आंदोलन करत आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
बच्चू कडू यांची भूमिका संधिग्ध :सध्या सरकारमध्ये असलेले बच्चू कडू यांची भूमिका नेहमी सांधिग्ध राहिली आहे. त्यांना नेमके काय करायचे आहे, हे त्यांनाच माहिती नाही. खरे तर त्यांच्या पाठिंब्याने काहीही फरक पडत नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षातील आमदारांच्या मनात तीव्र भावना आहेत. फुटून गेलेल्या आमदारांमध्ये समाधानाची भूमिका राहिली नाही, पुलावरून पाणी गेले आहे. त्यामुळे आता पाठिंब्याबाबत प्रश्न उपस्थित होत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.