औरंगाबाद - लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी शाळा सुरू करण्यासाठी अनेक संभ्रम आहेत. त्यात अंगणवाडीत पालक विद्यार्थ्यांना पाठवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने ऑनलाईन अंगणवाडी अस्तित्वात आणली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात पालकांशी संवाद साधून व्हाट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दिले जाणारे व्हिडिओ पाहून पालक रोज एक-दोन तास आपल्या मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्रयशक्ती वाढत आहे. राज्यात शाळा सुरू झाल्या नसल्या तरी औरंगाबादच्या अंगणवाड्यामध्ये 10 जूनपासून शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
औरंगाबादेत अंगणवाडी ऑनलाईन राज्यात गेल्या तीन वर्षांपासून 'आकार' प्रणाली पद्धतीने अंगणवाडीत शिक्षण दिले जात आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा पुन्हा कधी सुरू होतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्यात नियम-अटी लावून शाळा सुरू जरी झाल्या तरी पालक आपल्या मुलांना पाठवतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना वयाच्या 3 ते 6 या वयात दिलेले शिक्षण हे त्यांचा बहुतांश विकास करतो. त्यामुळे या वयात मिळणाऱ्या शिक्षणापासून मुले वंचित राहू नये, यासाठी औरंगाबाद जिल्हापरिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून या 'आकार' प्रणालीला "ई-आकार" पद्धतीत विकसित करण्यात आले. अंगणवाडी सेविकेंच्या मदतीने प्रत्येक भागातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला गेला. ४३ हजार पालकांना जवळपास ३ हजार व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून जोडण्यात आले. या ग्रुपमधून रॉकेट ग्रुपच्या मदतीने एकाच वेळी संपर्क साधता येतो. या व्हाट्स अॅप ग्रुपवर रोज तीन वेगवेगळे ऍक्टिव्हिटी बेस विडिओ टाकले जातात. ते व्हिडिओ बघून पालक घरीच मुलांना शिक्षण देत आहेत.
विशेष, म्हणजे शिक्षण देताना आई आणि वडील दोघेही सहभाग घेत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंडावले यांनी व्यक्त केले आहे. मुलांचा बौद्धिक विकास वयाच्या 3 ते 6 वर्षात सर्वाधिक होतो हे पक्षात घेता शिक्षण पद्धतीत बदल केला. यासाठी अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला अनेक पालक जोडण्यास अडचणी होत्या. मात्र, आता प्रतिसाद वाढत असल्याने निश्चित चांगला आणि प्रेरणादायी उपक्रम राबवू असा विश्वास बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरीच पालकांच्या मदतीने शिक्षण देणे अडचणीचे आहे. मात्र, त्यावरही जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविकेंच्या माध्यमातून मार्ग काढला आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही किंवा शेतीच्या कामामुळे वेळ नाही, अशा विद्यार्थ्यांना आसपासच्या विद्यार्थ्यांसोबत जोडून शिक्षण दिल जात आहे. तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका स्वतः जाऊन शिक्षण देत आहेत. अशा पद्धतीने शिक्षण देताना पालकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अंगणवाडी सेविका पालकांशी थेट संवाद साधून त्या अडचणी सोडवण्याचे काम करत आहेत. सुरुवातीला अनेक अडचणी असल्या तरी आता अडचणी कमी होत असल्याचा अनुभव अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला. लहान मुलांना आवश्यक असलेले शिक्षण घरीच मिळत आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. अंगणवाडी सेविकांच्या मदत मोलाची ठरत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केली आहे.