औरंगाबाद -गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार नेहमीच अनियमित होत आहेत. दोन-दोन महिने पगार उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे पगार एक तारखेला झाले पाहिजे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी एकत्र येत ऑनलाईन आंदोलन सुरू केले आहे.
वेतन वेळेवर मिळत नसल्याने आंदोलन -
बँकांचे कर्ज पतसंस्थांचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आजारपण अशा अनेक संकटांचा सामना शिक्षक गेल्या वर्षभरापासून करत आहे. जिल्हाभरातील सर्व संघटनांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला पगार सीएमपी प्रणालीद्वारे करा, अशी मागणी केली परंतु जिल्हा परिषदेचे प्रशासन गांभीर्याने घेत नाही. शिक्षकांच्या अडचणी समजून घेत नाही आणि सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे संघटनाचे प्रतिनिधी जिल्हा परिषदमध्ये जास्त वेळ जात नाही. प्रशासनाने त्याचा फायदा घेतला. त्यामुळे आणखीनच पगार उशिरा होऊ लागला असा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे.
रोज पाठवणार 200 फोटो -
शिक्षकांचे पगार एक तारखेला झाली पाहिजे, यासाठी एक अनोखे आंदोलन जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात प्रत्येक शिक्षकांनी आपल्या घरीच राहून पगार एक तारखेला करा, पगार सीसीएमपीद्वारे करा असे पोस्टरवर लिहून फोटो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून तर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना पाठवण्यात आले आहेत. रोज 200 फोटो पाठवायचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे.
संघटना विरहित शिक्षकांचे आंदोलन -
या आंदोलनाची सुरुवात आज 10 मे पासून करण्यात आली आहे. हे आंदोलन कोणत्याही संघटनेच्या बॅनरखाली नसून शिक्षकांच्या हितासाठी सर्व शिक्षकांच्या नेतृत्वाखाली संघटना विरहित आंदोलन केले जात आहे. असे विजय साळकर, दीपक पवार, कैलास गायकवाड, श्रीराम बोचरे, आर आर पाटील, संतोष ताठे, टी. के. पुनवटकर, गणेश आवचार, रंजीत राठोड, सतिश कोळी, कडुबा साळवे, विलास चव्हाण, अंकुश वाहून, बबन चव्हाण, राजेश पवार, दर्शन पाराशर, शिवाजी दांडगे, भाऊसाहेब बोरडे, बाबासाहेब जाधव आदींनी कळवले आहे.