औरंगाबाद/नाशिक- कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC ) दोन दिवसात कांद्याचे दर गडगडले आहेत. 55 ते 60 पैसे किलो इतका दर शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला आहे. कांदा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्वाचा पदार्थ आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याचे पीक घेतो. गेल्या काही वर्षात कांद्याला चांगले दर मिळत असताना कांदा लागवड 20 हजार हेक्टरने वाढली आहे. नवीन कांदा बाजार पेठेत दाखल झाला आणि कांद्याचे दर गडगडले. किमान दर 1 रुपयांपर्यंत असताना अचानक कांद्याला 55 ते 60 पैसे इतका दर शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे होणार खर्च आणि मिळणार उत्पन्न याचा ताळमेळ बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, निर्यात बंदी उठल्याने कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा कांदा व्यापारी विशाल पाडसवान व्यक्त केली आहे.
सर्वसामान्यांना कांदा महागच -कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने, कांद्याला 75 पैसे ते 5 रुपयांपर्यंत दर मिळत होते. मात्र, अचानक दर घडगडले आणि दर 55 पैसे ते साडेतीन रुपये इतका देण्यात आला. तरी सर्व सामान्यांना बाजारात कांदा 7 ते 10 रुपये किलो या दराने मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच दर कमी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.