औरंगाबाद -औरंगाबादकडून जालन्याला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिडको चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
अपघातग्रस्त बस औरंगाबादकडून जालन्याला जात होती. बस सिडको चौकातील सिग्नलवर आली असता, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पाठीमागून दुचाकीला धडकली. सिडको चौकात सिग्नल लागला असल्याने एक बस दुचाकीच्या समोर उभी होती. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीवर असलेले दोघेही या बसखाली आले. यामध्ये चालक शुभम शिंदे हा गंभीर जखमी झाला तर, दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दोघेही दुचाकीस्वार हे बीड जिल्ह्यातल्या परळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी
बसने दुचाकीला दिलेली धडक इतकी भीषण होती की, बस मधील दहा ते बारा प्रवासी यात जखमी झाले आहेत. तर एक प्रवासी बेशुद्ध झाला . या सर्व प्रवाशांना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.