औरंगाबाद- उल्कानगरी येथे सदनिकेला आग लागल्यानंतर धुरामुळे गुदमरून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घराच्या खालच्या मजल्याला आग लागल्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुंबाला घराबाहेर पडता आले नाही. यात 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज पहाटे 5 च्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया संस्कार श्यामसुंदर जाधव (वय 14 वर्षे), असे मृत मुलाचे नाव आहे. श्यामसुंदर बाबासाहेब जाधव (वय 45 वर्षे), सविता श्यामसुंदर जाधव (वय 39 वर्षे), मुलगी संस्कृती श्यामसुंदर जाधव (वय 19 वर्षे) अशी उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे आहे. मूळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील श्यामसुंदर जाधव यांचा एलईडी व सोलार ऊर्जेच्या उपकरण विक्रीचा व्यवसाय आहे. एक वर्षापूर्वी अविनाश पाठक यांच्या सहा खोल्यांच्या सदनिकेत जाधव कुटुंब भाड्याने राहते.
बुधवारी (दि. 26 फेब्रुवारी) रात्री कुटुंबीय झोपी गेले असताना शॉर्टसर्किटमुळे घराच्या पाठीमागील खोलीत अचानक आग लागली. त्यामुळे एलईडी बल्ब आणि सोलार उर्जाच्या उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात आणि घरात धुराचे लोळ पसरले. धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. धुरापासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी आरडा-ओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आली. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमन दल दाखल झाल्यावर जाधव कुटुंबीयांच्या बचावासाठी दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडला. तोपर्यंत जाधव कुटुंबीय बेशुध्द पडलेले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांना तत्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संस्कारचा तोपर्यंत गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -दहावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, गावावर शोककळा